नवी दिल्ली : जानेवारी महिन्यामध्ये देशाच्या निर्यातीत ६.२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यातआली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जानेवारी महिन्यातील वाढ महत्त्वपूर्ण ठरली आहे. मार्च २०१९ नंतर हा निर्यातीचा सर्वोच्च स्तर आहे. वाणिज्य मंत्रालयाने सुरुवातीला ५.४ टक्के निर्यातीचा अंदाज वर्तवला होता. मात्र, त्यामध्ये जादा वाढ नोंदवली गेली आहे.
दुसरीकडे आयातीमध्येही सलग दुसऱ्या महिन्यात वाढ नोंदवली गेली आहे. मात्र, जानेवारी महिन्यात यामध्ये २ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या ७.६ टक्क्यांच्या आयातीच्या तुलनेत ही वाढ कमी आहे. निर्यातीत वाढ झाल्यामुळे व्यापारातील तूट जानेवारी महिन्यात घटून १४.५४ अब्ज डॉलरवर आली आहे. डिसेंबर २०२० मध्ये ही व्यापार तूट १५.४४ अब्ज डॉलर इतकी होती. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात निर्यात वाढून २७.४५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. एक वर्षापूर्वी ही निर्यात २५.८५ अब्ज डॉलर इतकी होती. दुसरीकडे आयात वाढून ४१.९९ अब्ज डॉलरची झाली आहे. एक वर्षापूर्वी ही आकडेवारी ४१.१५ अब्ज डॉलरवर होती.
महत्त्वाची बाब म्हणजे, पेट्रोल, ज्वेलरी वगळता अन्य एक्स्पोर्ट जानेवारीत १३.४ टक्क्यांनी वाढला आहे. याच पद्धतीने नॉन ऑइल आणि नॉन गोल्ड आयात गेल्या महिन्यात ७.५ टक्के वाढली. कमोडिटीच्या निर्यातीत गतीने वाढ पहायला मिळाली आहे. तांदूळ, गहू, खाद्यतेल, इंजिनीअरिंग गुड्स, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे यांच्या निर्यातीत चांगली वाढ दिसून आली आहे. तर पेट्रोलियम पदार्थांच्या निर्यातीमध्ये ३२ टक्क्यांची घसरण झाली आहे. याशिवाय गारमेंटच्या निर्यातीत ११ टक्के घट झाली आहे.
निर्यातीची ही सद्यस्थिती पाहता लेदर, ज्वेलरी, अॅपरल्स आदी वगळता आपल्या पारंपरिक आणि श्रमावर आधारित क्षेत्रामध्ये निर्यातीसाठी अतिशय कठिण कालखंड असल्याचे फियोचे अध्यक्ष शरद सराफ यांनी सांगितले.