बागपत : शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेवर आणि पुरेसे मिळत नसले तरी साखर कारखान्यांमध्ये यंदा साखरेचे बंपर उत्पादन झाले आहे. बागपतमधील तिन्ही साखर कारखान्यांनी एकूण १.३९ कोटी क्विंटलहून अधिक उसाचे गाळप करून १४.६८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आतापर्यंत पन्नास टक्के गाळप झाले आहे.
मलकापूर साखर कारखान्याने ६७.८२ लाक क्विंटल उसाचे गाळप करून सरासरी १०.८१ टक्के साखर उताऱ्यासह ७.३२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. बागपत सहकारी कारखान्याने २३.८६ लाख क्विंटल उसाचे गाळप केले असून त्यांचा सरासरी साखर उतारा १०.१३ टक्के इतका आहे. कारखान्याने २.४२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. दुसरीकडे रमाला साखर कारखान्याने ४७.८९ लाख क्विंटल उसाचे गाळप केले असून या कारखान्याने १०.३४ टक्के साखर उताऱ्यासह ४.९४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आतापर्यंत पन्नास टक्के उसाचे गाळप झाले असल्याचे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. अनिल कुमार भारती यांनी सांगितले. आता शेतकऱ्यांना उसाचे पैसे लवकर मिळावेत यासाठी साखर कारखान्यांच्या प्रशासनावर दबाव आणला जात आहे.
दरम्यान, तिन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ४२७.३१ कोटी रुपये थकवले आहेत. ऊस विभागाने या थकबाकीवर ४.९६ कोटी रुपयांचे व्याज लागू केले आहे.
हजारो शेतकऱ्यांकडून उसाची नोंदच नाही. बागपतमधील हजारो शेतकऱ्यांनी जमिनीचा तपशील देऊन आपले नोंदणीपत्र दिलेले नाही. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक अनिल कुमार यांनी सांगितले की, ऊस विभागाने आपल्या संकेतस्थळावर जमिनीचा तपशील आणि घोषणापत्र अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आठ हजार शेतकऱ्यांनी अद्याप तपशीलच दिलेला नाही. त्यासाठी फेब्रुवारी अखेरपर्यंत मुदत आहे. जिल्ह्यात १.१९ लाखाहून अधिक ऊस उत्पादक शेतकरी आहेत.