प्रगतशील शेतकरी बनणार ऊस विभागाचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

सहारनपूर : ऊस विभागाकडून जिल्ह्यातील १६० प्रगतशील शेतकऱ्यांना ब्रँड अॅम्बॅसेडर बनविण्यात येणार आहे. प्रगतशील शेतकरी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत बनावेत या उद्देशाने ही योजना हाती घेण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ देण्यासह त्यांनी शेतीत केलेले यशस्वी प्रयोग आणि नव तंत्रज्ञानाचा वापर यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात पिकांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ऊस शेतीसाठी येणारा वाढता खर्च पाहता ऊस विभाग अशा प्रगतशील शेतकऱ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोगांतून हे शेतकरी अधिक उत्पादन, उत्पन्न मिळवू शकतात. जिल्ह्यात सर्व आठ ऊस विकास परिषदांमधून प्रत्येकी २० शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.

ऊस पिकासाठी शेतामध्ये ठिबक सिंचन तंत्रज्ञान वापरल्याने पाण्याची बचत होतेच. शिवाय, खते आणि किटकनाशकेही देणे सहजपणे शक्य होते. यातून वेळेचीही बचत होईल. नवीन तंत्रज्ञान वापरल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल आणि खर्च कमी होईल. मल्चिंगच्या प्रयोगातून तसेच पाचट कुट्टी केल्यामुळे आणि ते शेतातच मिसळल्याने जमिनीत जीवाणूंचे प्रमाण वाढते आणि पाला पेटवून होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करता येतो. उसाचे फुटवे अधिक येणे आणि खतांच्या वापरावरील नियंत्रण यातून शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळणार आहे.

जिल्ह्यातील १६० प्रगतशील शेतकऱ्यांना ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून निवडले जाईल. हे शेतकरी आधुनिक कसे होतील यावर अधिक भर दिला जाणार आहे. त्यातून हे शेतकरी इतरांसाठी प्रेरणास्रोत बनतील. शेतकरी आपल्या शेतीत नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी करतील. त्यातून शेती अधिकाधिक फायदेशीर होईल असे जिल्हा ऊस अधिकारी कृष्णमोहन मणि त्रिपाठी यांनी सांगितले.

निवडलेल्या शेतकऱ्यांना मिळणार सुविधा
– ऊस पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन सुविधा
-ऊस लावणीसाठी नव्या पद्धतीचा वापर
– दर्जेदार ऊस बियाण्यासाठी प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here