कठमांडू : साखर कारखान्यांकडून ऊसाचे पैसे मिळण्यास उशीर होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी हळूहळू इतर पिकांकडे वळत आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना आता ऊस खरेदी करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. अलिकडेच अनेक शेतकऱ्यांनी ऊस शेती बंद केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या घटल्याने ऊसाचे उत्पादनही खालावले आहे.
देशातील साखर कारखान्यांपैकी चार साखर कारखान्यांचे गाळप पूर्णपणे थांबले आहे. यांदरम्यान, उर्वरीत १० साखर कारखाने उसाअभावी कमी क्षमतेने सुरू आहेत. नेपाळ ऊस उत्पादक संघटनेचे (एनएफएसपी) अध्यक्ष कपिलमुनी मैनाली यांनी सांगितले की, गेल्या सात वर्षांपासून दरवर्षी ऊसाचे उत्पादन वीस टक्क्यांनी घटत आहे.
मैनाली म्हणाले, सात वर्षांपूर्वी साखर कारखान्यांकडून २६ मिलीयन टनहून अधिक ऊस गाळप करण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षी फक्त १६ मिलियन टन उसाचे गाळप केले गेले. या वर्षी ऊस उत्पादनात घसरण होण्याची शक्यता आहे. या हंगामात काही साखर कारखान्यांना उसाची टंचाई आणि ऊस नेण्यासाठी वाहने मिळण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे कामकाज बंद करावे लागत आहे.
नेपाळ शुगर मिल्स असोसिएशननुसार, श्री राम शुगर मिल लिमिटेड, अन्नपूर्णा शुगर मिल, इंदिरा शुगर मिल आणि लुंबिनी साखर कारखाना बंद करावा लागला आहे.