बिनौली : किनौनी येथील बजाज हिंदूस्थान साखर कारखाना आणि ऊस विभागाच्या संयुक्त विद्यमाने बरनावा येथील लाक्षागृहात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांनी प्रगत जातींच्या उसाच्या बेण्यांची लागवड करावी असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले.
मेरठचे जिल्हा सहकार अधिकारी दुष्यंत कुमार म्हणाले, शेतकऱ्यांनी खंदक पद्धतीने उसाची लागण केली पाहिजे. त्यातून अधिक फायदेशीर पिक घेता येईल. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक अमर प्रताप सिंह यांनी कमी खर्चात उसाचे उत्पादन कसे घ्यावे याविषयी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी ऊस हंगामाचे वेळापत्रक तयार करावे आणि नर्सरीतून रोपे आणून लागवड करण्याचे आवाहन त्यांनी केले. किनौनी साखर कारखान्याचे युनीट हेड के. पी. सिंह यांनी अधिक उत्पादनासाठी उसामध्ये डाळी, तेलबिया तसेच भाजीपाला लागवड करण्याबाबत मार्गदर्शन केले. याशिवाय शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुभेदार मुकेश भार्गव यांनी सेंद्रिय उत्पादनांबाबत माहिती दिली. अनिक कुमार छिल्लर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास समितीचे सचिव प्रदीप यादव, व्यवस्थापक राज कुमार ताया, महकार सिंह, अनिल कुमार, राज सिंह, गगन धामा, सुधांशू जैन, प्रविण तोमर, किरण पाल, पुष्पेंद्र तोमर, संजीव कुमार, योगेंद्र सिंह आदी उपस्थित होते.