सीकर : केंद्र सरकारने जर तिन्ही कृषी कायदे रद्द केले नाहीत तर शेतकरी ४० लाख ट्रॅक्टर घेऊन संसदेवर मोर्चा काढतील असा इशारा भारतीय किसान युनीयनचे (बिकेयू) नेते राकेश टिकैत यांनी दिला. राजस्थानमधील सिकर येथे एका शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. कृषी कायदे जर कायमस्वरुपी रद्द केले गेले नाहीत, तर यावेळी फक्त चार लाख नव्हे तर ४० लाख ट्रॅक्टर संसदेवरील मोर्चात सहभागी होतील असे टिकैत म्हणाले.
शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (एमएसपी) निश्चित करण्यासाठी कायदा बनवला जावा अशी मागणी टिकैत यांनी केली. १८ फेब्रुवारी रोजी हरियाणातील खरक पुनीया येथील एका महापंचायतीमध्ये टिकैत म्हणाले, केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आम्ही सर्वत्र प्रचार करणार आहोत. जर आमच्या मागण्या रद्द केल्या नाहीत तर आ्ही आंदोलन पश्चिम बंगालपर्यंत नेऊ. पश्चिम बंगालमध्ये रॅली काढण्यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून दिल्लीच्या विविध सीमांवर आंदोलन सुरू केले आहे.