नवी दिल्ली : चीनी मंडी
अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा सकारात्मक परिणाम भारत आणि चीनच्या व्यापार संबंधांवर होताना दिसत आहे. अमेरिकेबरोबर संबंध चांगले न राहिल्याने चीनने भारतासोबत चांगले संबंध राखण्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चीनमधील साखर रिफायनरीजनी भारतातून कच्ची साखर आयात करण्याची तयारी दर्शविली आहे. या रिफायनरीजचे अध्यक्ष आता भारत दौऱ्यावर येणार असून, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये साखरेचा व्यापार करण्याला मंजुरी मिळणार आहे. जर, किंमत योग्य असले, तर आम्ही साखर खरेदी करू, असे चीनच्या साखर असोसिएशनचे अध्यक्ष ल्यू हांडी यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे चीनला इतर देशांशी चांगले संबंध ठेवणे भाग पडले आहे. भारतासाठी मात्र ही एक नामी संधी आहे. कारण, उच्चांकी साखर उत्पादनामुळे स्थानिक बाजारातही फारशी चांगली स्थिती नाही. चीनने बासमती व्यतिरिक्त इतर तांदूळ खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. या तांदुळानंतर भारतातून चीनला निर्यात होणारे साखर ही दुसरे मोठे कृषी उत्पादन असणार आहे, असे भारताच्या वाणिज्य मंत्रालयाने सांगितले.
शांघाय ब्युयून इनव्हेस्टमेंट कंपनीचे मॅनेजर झॅन शिओ म्हणाले, ‘अमेरिकेशी असलेल्या मतभेदांमुळे काही ठराविक मर्यादेपर्यंत वस्तूंची आयात होण्याची शक्यता आहे. पण, चीनने आपल्या व्यापार सहयोगी देशांशी मोकळेपणा ठेवला पाहिजे. भारताला अपेक्षित असल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात साखर खरेदी होणार नाही. चीनमध्येही मोठ्या प्रमाणावर साखर साठ असल्यामुळे अंदाजे सात लाख टन साखरेची खरेदी होईल.’ चीनमध्ये साखरेचा साठा अजूनही असल्यामुळे भारताकडून कदाचित साखर आयातही केली जाणार नाही, असे ल्यू हांडी यांनी स्पष्ट केले.
भारतात निर्यातवाढीला प्रोत्साहन देण्यात येत असून, साखर कारखान्यांना निर्यातीसाठी अनुदान दिले जात आहे. भारताने या हंगामात ५० लाख टन साखर निर्यातीचे टार्गेट निश्चित केले आहे. त्यात २० लाख टन साखर चीनला निर्यात करण्याचा भारताचा इरादा आहे. त्यासाठी चीन सरकारने तेथील साखर रिफायनरीजना तातडीने आयात परवाने देणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले आहे.
किती साखर निर्यात होणार?
मुळात चीनमध्ये सध्या जाहीर करण्यात आलेल्या कोट्यापेक्षा अधिक साखर आयात केली, तर त्यावर ९० टक्के आयातशुल्क लागू होते. स्थानिक शेतकरी आणि उद्योगाला बळ देण्यासाठी तेथील सरकारने अशा प्रकारे आयातीवर जास्त कर लागू केला आहे. याबाबत ल्यू म्हणाले, ‘सरकार किती आयात कोटा जाहीर करणार आहे, हे आताच सांगता येणार नाही. त्याचबरोबर भारतासोबत चीन विशेष करार करणार का?, अशीही शंका आहे.’