इस्लामाबाद : देशभरातील बहुतांश ग्राहक केंद्रांमध्ये साखरेचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे ग्राहकांना खुल्या बाजारातून जादा दराने साखर घ्यावी लागत आहे.
प्रसार माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, गेल्या दोन दिवसात देशातील बहुतांश ग्राहक केंद्रांमधील साखर गायब झाली आहे. आणखी सात दिवस साखर उपलब्ध होणार नाही, असे ग्राहक केंद्रांनी नागरिकांना सांगण्यात आले आहे. युटिलीटी स्टोअर कॉर्पोरेशनकडे सद्यस्थितीत साखर उपलब्ध नाही. त्यामुळे तुटवडा भरून काढण्यासाठी साखर खरेदीसाठी सहा निविदा मागविण्यात आल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार, अखेरच्या निविदेतून केवळ २०००० मेट्रिक टन साखर खरेदी केली गेली होती. दुकानांमध्ये साखर उपलब्ध होण्यास आणखी एक अथवा दोन आठवडे लागू शकतात.
दुसरीकडे ट्रेडिंग कार्पोरेशन ऑफ पाकिस्तानकडून (टीसीपी) २ मार्च रोजी साखरेच्या निविदा जारी केल्या जातील. आयातीबाबत करार करण्यात आल्यानंतरही साखर पाकिस्तानात पोहोचण्यास दोन आठवड्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. गेल्या वर्षभरात देशात साखरेच्या किमती भडकल्या आहेत. त्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी देशभरात साखर माफियांविरोधात कारवाईची मोहीम सुरू केली आहे.