मेरठ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सुमारे १८००० कोटी रुपयांच्या थकीत रक्कमेप्रश्नी साखर कारखानदारांसमोर शक्तिहीन झाले आहेत अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली. उत्तर प्रदेशमधील मेरठ जिल्ह्यात आपल्या पहिल्या शेतकरी महापंचायतमध्ये ते बोलत होते. साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यात आदित्यनाथ अपयशी ठरल्याची टीका केजरीवाल यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, दिल्लीमध्ये तीन वीज कंपन्या आहेत. निवडणुकीपूर्वी आम्ही मोफत आणि अखंड वीज पुरवठ्याचे आश्वासन दिले. त्यावेळी मला सांगितले गेले की या कंपन्यांसोबत अशा प्रकारचे आश्वासन घेऊन काम करणे अशक्य आहे. या कंपन्या शक्तीशाली आहेत आणि त्यांचे काहींशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. पण, मी त्यांना योग्य रस्त्यावर घेऊन आलोय. आता या कंपन्या एक शब्दही बोलत नाहीत. यापूर्वी दिल्लीत ७ ते ८ तास वीज कपात व्हायची. आणि सरासरी २०००० रुपयांची बिले जारी केली जात होती. आता २४ तास वीज आणि शून्य रुपये बिल अशी स्थिती आहे. वीज कंपन्यांच्या तुलनेत हे साखर कारखाने तर खूप छोटे आहेत. मग, त्यांच्यासमोर तुम्ही शक्तीहीन का झालात असे मी योगी आदित्यनाथ यांना विचारू इच्छितो असे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.