लाहोर : उसाच्या चढ्या दरामुळे साखरेच्या उत्पादन खर्चात झालेल्या वाढीचा परिणाम साखरेच्या किंमतीवर झाल्याचा ठपका पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने (पीएसएमए) ठेवला आहे. साखरेचा एक्स मील दर १०० रुपयांऐवजी ८८-८९ रुपये प्रतिकिलो यांदम्यान आहे. मात्र दलालांकडून साखर कारखान्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही फसवणूक सुरू असल्याचे पीएसएमएच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, या व्यवसायातील मध्यस्तांनी काही भागामध्ये शेतांमध्येच ऊसाची खरेदी केली आणि शेतकऱ्यांना रोख पैसे दिले. त्यामुळे उसाच्या दरात कृत्रिम दरवाढ झाली. साखर कारखानदार बँकांच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला पैसे देण्यास बांधील आहेत. शेतकऱ्यांना थेट रोख उसाचे पैसे देण्यास सरकारने कारखानदारांना मनाई केली आहे असे प्रवक्त्यांनी सांगितले. सध्याच्या गळीत हंगामामध्ये उसाचा सरासरी दर प्रति ३० किलो ३०० रुपयांपर्यंत आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.