कोल्हापूर : महाराष्ट्रात फेब्रुवारी अखेरपर्यंत १८३ साखर कारखान्यांपैकी फक्त ७९ कारखान्यांनी एफआरपीच्या शंभर टक्के रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गळीत हंगामात सहभागी झालेल्या १८३ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना १६,२७५ कोटी रुपये देणे अपेक्षित आहे. मात्र, फेब्रुवारी अखेरपर्यंत फक्त ७९ कारखान्यांनी १३९१७ कोटी रुपये ऊस उत्पादकांना देण्यात आले आहेत. अद्याप २३६७ कोटी रुपये थकीत आहेत.
प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, अनेक साखर कारखान्यांनी आर्थिक तसेच इतर अडचणी असतानाही शेतकऱ्यांना पैसे देण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत थकबाकी २५३५ कोटी रुपये होती. ही थकबाकी महिना अखेरीस २३६७ कोटी रुपये झाली आहे. ३८ साखर कारखान्यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस ८०-९९ टक्के पैसे दिले आहेत. तर ३६ कारखान्यांनी ६०-७९ टक्के पैसे दिले आहेत. आणखी ३९ कारखान्यांनी शेतकऱ्यांना ६० टक्क्यांपेक्षा कमी पैसे दिले आहेत.
गेल्या वर्षी १४१ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात सहभाग घेतला. यावर्षी ही संख्या वाढून १८७ झाली आहे. महाराष्ट्रात ८३२ लाख टन उसाचे गाळप झाले असून फेब्रुवारी अखेरपर्यंत ८५६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. अद्याप २०० लाख टन उसाचे गाळप व्हायचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.