पाटणा : बिहारच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी झालेल्या बैठकीत बहुप्रतिक्षीत इथेनॉल उत्पादन धोरणाला मंजुरी दिली. यासोबतच राज्य सरकारने विविध विभागांचे ३९ प्रस्तावही मंजूर केले.
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये इथेनॉल उत्पादन संवर्धन धोरण प्रमुख असल्याचा दावा एका अधिकाऱ्याने केला. उद्योग विभागाचे मंत्री शाहनवाज हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली हे धोरण ठरविण्यात आले आहे. ऊस आणि मक्यापासून इथेनॉल उत्पादन केले जाईल. बिहारमध्ये ऊस शेती समृद्ध आहे. याशिवाय मकाही विपूल प्रमाणात पिकवला जातो. किशनगंज, अररिया, कटिहार, खगडिया, भागलपूर आणि समस्तीपूरसह कोसी आणि सीमेवरील काही भागा देशातील मक्क्याच्या एकूण उत्पादनाच्या ३० टक्के उत्पादन घेतले जाते.
मुख्यमंत्री नितीश कुमार आणि मंत्री शाहनवाज हुसेन यांनी काही आठवड्यांपूर्वी या धोरणाचा आढावा घेतला. राज्यात इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. हे धोरण उद्योग आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करेल. त्यातून रोजगारच्या संधी आणि ऊस, मका पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना कमाईची चांगली संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. बिहार सरकारने २००७ मध्ये इथेनॉल उत्पादन युनीट सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, यूपीए सरकारने तो परत पाठवल्याचा आरोप नीतीशकुमार यांनी यापूर्वी केला होता. सध्याच्या सरकारने प्रस्तावास मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. बंद साखर कारखाने या धोरणांतर्गत सुरू करता येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत केले होते.