नवी दिल्ली : चीनी मंडी
युक्रेनच्या प्रक्रियायुक्त पांढऱ्या साखरेचा सर्वांत मोठा खरेदीदार देश असलेल्या उझबेकिस्तानने युक्रेनकडून साखर आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनचा साखर महासंघ युक्रेत्सुकोर यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. याबाबत उझबेकिस्तानकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
युक्रेनच्या साखरेचा उझबेकिस्तान हा सर्वांत मोठा खरेदीदार होता. पण, गेल्या सहा महिन्यांपासून ही बाजारपेठ युक्रेनच्या हातातून निसटत गेली. या संदर्भात युक्रेत्सुकोच्या रुसलाना ब्युतोलो यांनी सांगितले की, युक्रेनने २०१७-१८च्या हंगामात ५ लाख ६० हजार ४०० टन साखर निर्यात केली. त्यातील २ लाख ९ हजार ९०० टन साखर केवळ उझबेकिस्तानला निर्यात करण्यात आली होती. विशेष म्हणजे उझबेकिस्तानने कोणतेही कारण न सांगता युक्रेनच्या साखरेला कस्टम क्लिअरन्स दिला नाही.
या संदर्भात आताच कोणतिही प्रतिक्रिया देणे शक्य होणार नाही, असे युक्रेनच्या कृषी मंत्रालयाने म्हटले आहे. त्याचवेळी उझबेकिस्तानच्या कस्टम विभागानेही यावर कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनच्या एका जहाजावर हल्ला केला होता. त्यामुळे युक्रेनने मार्शल लॉ लागू केला आहे. त्याचा हा परिणाम असल्याचा केवळ अंदाज लावला जात आहे.