नवी दिल्ली: उत्तर प्रदेशमध्ये चालू गळीत हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी साखर उत्पादन झाले आहे. देशात यंदा गेल्या हंगामाच्या तुलनेत जादा साखर उत्पादन झाले असताना उत्तर प्रदेशात उत्पादन घटल्याचे दिसून आले आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) नव्या अहवालानुसार, उत्तर प्रदेशातील १२० कारखान्यांनी १५ मार्च २०२१ पर्यंत ८४.२५ लाख टन साखरेचे उत्पादन केले. १२० पैकी १८ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. यातील बहूतांश कारखाने पूर्व उत्तर प्रदेशमधील आहेत. गेल्यावर्षी राज्यात ११८ कारखाने सुरू होते. त्यांनी १५ मार्च २०२० पर्यंत ८७.१६ लाख टन साखर उत्पादन केले होते.
देशात १५ मार्च २०२१ पर्यंत २५८.६८ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. तर गेल्यावर्षी १५ मार्च २०२० पर्यंत २१६.१३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. १५ मार्च २०२१ पर्यंत १७१ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. तर ३३१ कारखाने गाळप करीत आहेत. गेल्यावर्षी १५ मार्च २०२० पर्यंत १३८ कारखान्यांनी गाळप बंद केले होते. तर ३१९ कारखाने गाळप करीत होते.