उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादकांना उच्चांकी १.२७ लाख कोटींची बिले अदा

लखनौ : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत जबरदस्त बदल घडला आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
मुख्यमंत्री योगी म्हणाले, आमच्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना उच्चांकी १२७ लाख कोटी रुपये वितरीत झाले आहेत. याशिवाय, गहू, तांदूळ, मक्का, भुईमुगाची विक्रमी खरेदी केली आहे. गहू, ऊस, साखर, हिरवा वाटाणा, बटाटा, दुध, आंबे, आवळा आदींच्या उत्पादनात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत पिकांच्या उत्पादनात पिछाडीवर असलेले राज्यातील शेतकरी मुख्य प्रवाहात आले आहेत.

गेल्या चार वर्षांत योगी सरकारने शेतकरी आणि शेतीसाठी एकापाठोपाठ एक बाराहून अधिक निर्णय घेतले आहेत. पहिल्या कॅबिनेट बैठकीत ८६ लाख लघु आणि मध्यम गटातील शेतकऱ्यांचे ३६००० कोटी रुपयांचे पीककर्ज माफ करणाऱ्या सरकारने चार वर्षात शेतकऱ्यांना एमएसपीवर ३७८ लाख मेट्रिक टन खाद्यान्न खरेदी करून ६६००० कोटी रुपयांहून अधिक पैसे दिले आहेत.

राज्य सरकार कृषी क्षेत्राला सुदृढ आणि मजबूत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे शेतकरी कल्याण मिशन चालवत आहे. एमएसपीमध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. ४६ वर्षांपासून प्रलंबीत बाण सागर योजनेसह एकूण ११ पाणी योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यातून २.२१ लाख हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमतेची वृद्धी झाली आहे. त्याचा फायदा २.३३ लाख शेतकऱ्यांना थेट झाला आहे. सद्यस्थितीत चालू आर्थिक वर्षात एकूण नऊ योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. यासाठी १६.४१ लाख हेक्टरचे जादा अतिरिक्त सिंचन क्षमता वाढेल. त्याचा लाभ ४०.४८ लाख शेतकऱ्यांना होईल. मुंडेरवा, पिपराइच यांसह रमाला साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढीसह एकूण ११ कारखान्यांची क्षमता वाढविण्यात आली आहे.

कोरोनाच्या काळात राज्यातील ११९ कारखाने सुरू ठेवून सरकारने जगासमोर एक उदाहरण ठेवले आहे. १ लाख २७हजार ४२८ कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले आहेत. २६७ नव्या खांडसरी सुरू करण्यासाठी लायसन्स दिली आहेत.

भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर २२० नव्या ठिकाणी शेतकरी बाजार सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी आणि ८४ हजार व्यावसायिक एकमेकांशी जोडले आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या निधीतून २३२.६३ लाख शेतकऱ्यांना २८ हजार ४४३ कोटी रुपये डीबीटीतून थेट खात्यात मिळाले आहेत. यात उत्तर प्रदेश अग्रेसर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here