मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये कोरोनाने घट्ट विळखा घातला आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी मुंबईत कोरोनाचे नवे ३७७५ रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात आढळलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर शहरात दहा जणांचा मृत्यू झाला आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, शहरातील नव्या रुग्णांच्या वाढीचा दर ०.६३ टक्के इतका वाढून २.१५ टक्के झाला आहे. मुंबईत नव्या रुग्णांची संख्या ३७७९ ने वाढल्यानंतर देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनाग्रस्तांची संख्या ३,६२,६७५ झाली आहे. या महामारीने ११,५८६ जणांचा बळी घेतला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३०,५३५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत ही संख्या ३८८९ आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासून एका दिवसात आढळणारी ही सर्वोच्च रुग्ण संख्या आहे. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता अनेक प्रकारचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीसुद्धा दररोज रुग्ण संख्या वाढत चालली आहे.