कोल्हापूर, ता.3 : गेल्या वर्षीच्या विक्री कोट्यातील 40 ते 50 टक्के साखर शिल्लक आहे. साखरेच प्रतिक्विंटलचे दर 2900 रुपयांवरून खाली आले आहेत. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आहेत, असे दुखण मांडत आज साखर कारखान्यांनी एफआरपी देण्याऐवजी आपले दुखणे मांडूनच बैठक आटोपती घेतली. तर, शासनाने तत्काळ निर्णय घेवून साखरेचे प्रतिक्विंटलचे विक्री दर वाढविले पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान विक्री दर 3100 रुपये करण्याची ग्वाही दिली होती. त्यानूसार त्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी आज सर्व साखर कारखानदारांनी केली. कोल्हापूर येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.
साखर कारखाने सुरू होवून पंधरा ते वीस दिवस होत आले. आतापर्यंत पहिल्यादिवशी ऊस तोड झालेल्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर एफआरपीची रक्कम जमा झाली पाहिजे होती. दरम्यान, साखर कारखानदारांनी आणि कार्यकारी संचालकांनी येथील खासगी हॉटेलमध्ये बैठक घेतली. यामध्ये, साखरेला उठाव नाही, साखरेला मागणी नाही, साखर दर क्विंटलला रुपयांपर्यंत खाली ढासळलेले आहेत, त्यामुळे ग्राहक नाही.
साखरेच्या गतमहीन्याच्या रिलीज कोट्यापैकी साखर कारखान्यांची 40 ते 50 टक्के साखर विक्री झालेली नाही. जागतिक बाजारपेठेत निर्यातीचे साखरेचे भाव 385 डॉलरवरून 340 डॉलरवर खाली आलेले आहेत. तसेच डॉलरचा भाव 74 रुपयावरून 70 रुपयांवर खाली आलेला आहे. त्याचा परिणाम साखर निर्यातीवर झालेला आहे. साखर निर्यात करण्यास बॅंका तयार नाहीत. बॅंकांकडूनही साखर निर्यातीसाठी फरकांच्या रक्कमांबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्याचाही परिणाम साखर निर्यातीवर झालेला आहे. गेल्यावर्षी निर्यात केलेल्या साखरेचे अनुदान कारखान्यांना अजूनही मिळालेले नाही. बफरस्टॉक होऊन सहा महिने उलटले तरी त्याचे अनुदान कारखान्यांना मिळालेले नाही. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते की, टनाला 3100 रुपये ऊसदर मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करू. अद्याप त्याचाही निर्णय झालेला नाही. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कोणतेही अनुदान केंद्र शासनाकडून अद्यापही जाहीर केलेले नाही. त्यामुळे दैनंदिन कामकाजामध्ये साखर कारखान्यांना अनेक आर्थिक अडचणी येत आहेत. तसेच सध्याचे साखरेचे धोरण, बॅंकांचे धोरण आदी सर्व बाबींवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी, आमदार हसन मुश्रीफ, विनय कोरे, गणपतराव पाटील, माधवराव घाटगे, मनोहर जोशी, पी.जी.मेढे आदी उपस्थित होते.