सातारा : सह्याद्री साखर कारखान्याच्या थकीत बिलप्रश्नी आंदोलन करण्यास जाणाऱ्या
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना पोलिसांनी रोखले. त्यानंतर शेतकऱ्यांनी कराड येथे शासकीय विश्रामगृहासमोर निदर्शने केली.
ऊस बिल थकबाकीप्रश्नी बेमुदत धरणे आंदोलन करण्याची घोषणा माजी खासदार शेट्टी यांनी केली होती. गुरुवारी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घटनास्थळी जाण्यापूर्वी पुणे-बेंगलोर महामार्गावरच अडवले. शेट्टी यांना विश्रामगृहात थांबवून ठेवले. त्यानंतर तेथेच संघटनेच्या मागण्यांबाबत चर्चा झाली. माजी खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृहाबाहेर निदर्शने केली.
महाराष्ट्रात साखर कारखान्यांनी ८२८.२७ लाख टन ऊस खरेदी केला आहे. त्यापोटी त्यांना शेतकऱ्यांना १८,२२१.५० कोटी रुपये एफआरपी देय आहे. मात्र आतापर्यंत १५८५०.६१ कोटी रुपये देण्यात आले आहेत. सुमारे २३८५.०६ कोटी रुपये थकीत आहेत.
चालू हंगामात गाळप करणाऱ्या १८७ पैकी ९७ कारखान्यांनी एफआरपीबाबत शेतकऱ्यांशी करार केला आहे. मात्र अशा पद्धतीने एफपीआयची विभागणी करून शेतकऱ्यांना पैसे देण्यास शेट्टी यांनी विरोध केला आहे. चालू गळीत हंगामाच्या सुरवातीला शेट्टी यांनी एकरकमी एफआरपी आणि हंगाम संपल्यानंतर २०० रुपये देण्याची मागणी केली होती. तर शेतकऱ्यांचे पैसे थकवलेल्या सह्याद्री साखर कारखान्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली होती.