भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर, लॉकडाउनने फटका बसेल: आयएमएफ

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या परिणामांतून सावरत आहे. अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर आहे असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) म्हटले आहे. मात्र, पुन्हा लॉकडाउनने त्याला फटका बसेल असेही आयएमएफने म्हटले आहे.

आयएमएफचे प्रवक्ते गॅरी राइसयांनी सांगितले की, २०२०च्या चौथ्या तिमाहीत भारत जीडीपीच्या वास्तव वाढीचा दर पॉझिटिव्ह स्थितीत आला आहे. देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच जीडीपी सकारात्मक स्थितीत आहे. जीडीपीसोबत पीएमआयसारखे इंडिकेटर भारतासाठी सकारात्मक आहेत. त्यामुळे २०२१ च्या पहिल्या तिमाहीत चांगली रिकव्हरी होण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आणि स्थानिक स्तरावर केले जाणारे लॉकडाउन यामुळे जोखीम वाढली आहे.

जानेवारीत आयएमएफने आपल्या अहवालात देशाचा आर्थिक विकास दर ११.५ टक्के राहील असा अंदाज वर्तविला होता. मात्र, २०२० मध्ये अर्थव्यवस्था ८ टक्क्यांनी आकुंचन पावेल असेही आयएमएफचे म्हणणे आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या पुढील महिन्यात जागतिक बँकेसोबत होणाऱ्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. याशिवाय आयएमएफचा वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूक रिपोर्ट सहा एप्रिलला येणार आहे.

देशभरात पु्न्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, शुक्रवारी देशात नवे ५९,११८ रुग्ण आढळले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here