मुरादाबाद : राज्य सरकारने सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतरही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिले देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. जर कारखान्यांनी पैसे देण्यात सुधारणा केली नाही, तर पुढील गाळप हंगामात अशा कारखान्यांचा ऊस इतर कारखान्यांना दिला जाईल असा इशारा जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी दिला आहे.
जिल्हा ऊस अधिकारी अजय सिंह यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात झालेल्या आढावा बैठकीत साखर कारखान्यांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. कारखान्यांकडे १४ दिवसांपूर्वीचे ७८० कोटी रुपये थकीत आहेत. कारखान्यांनी फक्त ४३६ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. एकूण थकबाकीच्या फक्त ५५ टक्के ही रक्कम आहे. बेलवाडा कारखान्याने आतापर्यंत ४७ टक्के, रानीनांगलने ८५ टक्के, बिलारीने ५० टक्के आणि अगवानपूर साखर कारखान्याने ३६ टक्के उसबिले दिली आहेत.
ऊस बिले अदा करण्याची गती संथ असल्याने कारखान्यांना १४ दिवसांच्या नियमानुसार पैसे देण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कारखान्यांनी या सूचना गांभीर्याने घेतलेल्या नाहीत. जे कारखाने टाळाटाळ करतील, पैसे वेळेवर देणार नाहीत, अशा कारखान्याना पुढील गाळप हंगामात ऊस दिला जाणार नाही असा इशारा ऊस अधिकाऱ्यांनी दिला. तसा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला जाणार आहे. असा ऊस चांगला दर देणाऱ्या कारखान्यांना दिला जाईल असे त्यांनी सांगितले.