पुणे/कोल्हापूर : महाराष्ट्रातील शेतकरी अद्याप आपल्या शेतात उभ्या असलेल्या ऊसामुळे चिंतेत आहेत. राज्यात आतापर्यंत ६८ साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातून शेतकरी आता कर्नाटकातील कारखान्यांना ऊस पाठवू लागले आहेत. कारखाने बंद होऊ लागल्याने आपल्या शेतातील ऊस गाळपास जाईल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
महाराष्ट्रात चालू गळीत हंगामात १८८ कारखान्यांनी आतापर्यंत ९५७.६६ लाख टन उसाचे गाळप केले असून १०००.७१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. ऊस उत्पादकांच्या म्हणण्यानुसार, कारखान्यांना आपल्या ऊस गाळपाची गती वाढवावी लागणार आहे. काही कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका पुढील काही महिन्यात होत आहेत. त्यामुळे साताऱ्याचे बहुतांश कारखाने आपल्याकडील ऊस गाळपावर लक्ष ठेऊन आहेत.
लॉकडाउनची भीती
कर्नाटक सीमाभागातील अनेक साखर कारखान्यांनी गाळप बंद केल्याचे कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता इतर जिल्ह्यांतील कारखान्यांना ऊस पाठवावा लागत आहे. अनेक कारखाने हार्वेस्टर मशीनद्वारे ऊस तोडणीला गती देत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने लॉकडाउन लागू करण्याचा इशारा दिला आहे. परिणामी ऊस तोडणी मजूर आपापल्या गावाला परत जाण्याची घाई करत आहेत.
दरम्यान, इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि अहमदनगर विभागातील कारखाने लवकर बंद होतील. मात्र, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या परिसरातील कारखाने एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहू शकतात. इस्माच्या म्हणण्यानुसार, कारखाने बंद होण्याचे प्रमाण गेल्या दोन हंगामाच्या तुलनेत कमी आहे. वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनने (डब्ल्यूआयएसएमए) शेतकऱ्यांना सर्व उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाने बंद करू दिले जाणार नाहीत. कारखाने तोडणी, गाळपाचे काम पूर्ण करतील असे आश्वासन दिले आहे.