पुणे : चीनी मंडी
देशातील साखर उत्पादनाची घोडदौड उच्चांकाच्या दिशेने सुरू असल्याचे साखर हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात दिसून आले आहे. साखर हंगाम काही ठिकाणी उशिरा सुर झाला असला तरी, यंदाच्या हंगामात (२०१८-१९) ३० नोव्हेंबरपर्यंत देशात ३९ लाख ७३ हजार टन साखर उत्पादन झाल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिली आहे.
‘इस्मा’ने गेल्या हंगामातील साखरेच्या आकडेवारीशी यंदाची तुलना केली आहे. गेल्या वर्षी हंगामाच्या पहिल्या टप्प्यात ३० नोव्हेंबरपर्यंत देशात ४५० साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू होते. तर, यंदा ३० नोव्हेंबरपर्यंत ४१५ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. उत्तर प्रदेशात हंगाम उशिरा सुरू झाला आहे. तर, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ऊस दराचा प्रश्न चिघळल्यामुळे काही ठिकाणी कारखाने उशिरा सुरू झाले आहेत.
महाराष्ट्रात १६७ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. या कारखान्यांमधून ३० नोव्हेंबरपर्यंत १८ लाख ५ हजार टन साखर उत्पादन झाले असून, गेल्या वर्षी या काळातील उत्पादनाच्या तब्बल २१ टक्के जादा आहे. उत्तर प्रदेशमध्ये स्थिती थोडी उलटी आहे. तेथे ३० नोव्हेंबरपर्यंत १०९ साखर कारखाने सुरू झाले असून, त्यातून ९ लाख ५० हजार टन साखऱ उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात उत्तर प्रदेशमध्ये १०८ साखर कारखाने सुरू होते आणि त्यातून १३ लाख ११ हजार टन साखर उत्पादन झालेहोते. राज्यात प्रत्यक्ष गाळप सुरू होण्यास पंधरवड्याने उशीर झाल्याने परिणामी साखर उत्पादन घटल्याचे दिसत आहे.
कर्नाटकमध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत ६३ कारखान्यांमध्ये गाळप सुरू झाले होते. त्यातून ७ लाख ९३ हजार टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर २०१७पर्यंत ६२ साखर कारखान्यांनी मिळून ७ लाख २ हजार टन साखर उत्पादन केले होते. तर, गुजरामध्ये यंदा त्याच काळात १६ साखर कारखान्यांनी मिळून १ लाख ९५ हजार टन साखर तयार केली होती. तर, गेल्या वर्षी १७ कारखान्यांतून १ लाख ७८ हजार टन साखर तयार झाली होती.
देशात ऊस गाळप अतिशय संथ गतीने सुरू झाले. पण, आता त्याला वेग येत असल्याचे‘इस्मा’चे म्हणणे आहे. साखर उत्पादनासाठी महत्त्वाच्या असलेल्या राज्यांबरोबरच इतर राज्यांमध्येही ६० साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे. त्यात यंदाच्या हंगामात ३० नोव्हेंबरपर्यंत २ लाख ३० हजार टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात ९१ कारखान्यांनी २ लाख ३५ हजार टन साखर उत्पादन केले होते.