नवी दिल्ली : देशभरात आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविड १९ लस देण्यास सुरुवात झाली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे (एनएचए) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कोविड लसीकरणाची स्थितीचा आणि प्रश्नांची आढावा घेणारी बैठक झाली. एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिक लसीकरणास पात्र असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य सचिव भूषण यांनी केली.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिलपासून या वयोगटातील सर्व लोकांना लस देण्यात येईल. लसीकरणाची नोंदणी वेबसाईटवर करता येणार आहे. जर नोंदणी करायची नसेल तर दुपारी ३ वाजल्यानंतर तुम्ही जवळच्या लसीकरण
केंद्रात जाऊ शकता.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, जे नागरिक तत्काळ लसीकरणासाठी जाऊ इच्छितात, त्यांना आपल्या ओळखपत्रासह दुपारी तीन वाजता नजिकच्या आरोग्य केंद्रात जावे लागेल. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, बॅंक पासबुक, रेशनकार्ड यापैकी कोणतेही ओळखपत्र चालू शकते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात आतापर्यंत लस घेतलेल्यांची संख्या ६.४३ कोटी झाली आहे. भारतात १६ जानेवारीपासून कोविड १९ लसीकरणास सुरुवात झाली आहे.