मुंबई : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी देशांतर्गत साखर विक्रीसाठी प्रती क्विंटल १५० रुपये अनुदान मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
साखर उद्योगाशी संबंधीत प्रश्नांवर चर्चेसाठी महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आयोजित केलेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रात ३१ मार्च २०२१ अखेर १००.४७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर गेल्यावर्षी याच कालावधीत ५९ लाख टन साखर उत्पादित झाली होती. कारखान्यांनी आतापर्यंत ९६१ लाख टन उसाचे गाळप केले आहे. राज्याच्या इतिहासात हे सर्वाधिक गाळप आहे. यापूर्वी २०१७ मध्ये ९५४ लाख टन ऊस गाळप करण्यात आले होते. आतापर्यंत ११३ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. तर ७६ कारखाने अद्याप सुरू आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत १४६ पैकी २८ कारखाने सुरू होते.
उत्तर प्रदेशमध्ये १२० कारखान्यांनी ३१ मार्च २०२१ अखेर ९३.७१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. आतापर्यंत १२० पैकी ३९ कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. गेल्यावर्षी ११३ कारखान्यांपैकी ३१ मार्च २०२० पर्यंत ९७.२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.