मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता दिलीप वळसे-पाटील यांचे गृहमंत्रीपद निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना याबाबत पत्र पाठवून गृह मंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकार करावा आणि गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्याची विनंती केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते वळसे-पाटील यांच्याकडे सध्या एक्साईज आणि कामगार मंत्रालय आहे. आता कामगार मंत्रालयाचा कार्यभार हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त स्वरुपात दिला जाईल. तर एक्साईज विभागाची जबाबदारी उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असेल. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे गृह मंत्रीपद दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यास तयार होते. मात्र, प्रकृतीच्या कारणांमुळे वळसे-पाटील यांनी ते स्वीकारले नाही. याशिवाय अजित पवार यांनी हे पद वळसे-पाटील यांना देण्यास नापसंती दर्शविली होती. मात्र आता कठीण स्थिती उद्भवल्याने हे पद वळसे-पाटील यांना देण्यात आले.
दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात शरद पवार यांचे खासगी सहाय्यक म्हणून केली होती. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील युवा नेते म्हणून त्यांचा उदय झाला. १९९० मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिमकली. सलग २० वर्षे आंबेगाव मतदारसघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर ते पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिले. आघाडीच्या सरकारच्या काळात त्यांना सर्वश्रेष्ठ सदस्याचा पुरस्कार मिळाला. अर्थ विभाक, वैद्यकीय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, ऊर्जा विभागासह अनेक विभाग त्यांनी सांभाळले आहेत. २००९ ते २०१४ या काळात ते विधानसभा अध्यक्ष होते. सध्याच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे एक्साइज आणि कामगार मंत्रालय देण्यात आले होते.