लखनौ : अन्न प्रक्रिया उद्योगासाठी १२,९७० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूकीनंतर योगी आदित्यनाथ सरकार या क्षेत्रासाठी एक स्वतंत्र धोरण आखणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास मदत मिळू शकते आणि रोजगारही मोठ्या संख्येने उपलब्ध होतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
डेलीपायनिअर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, नव्या धोरणचा लाभ मोठ्या उद्योगांना होऊ शकतो. नव्या धोरणांतर्गत मोठ्या उद्योगांना १०० कोटी रुपयांपर्यंत अनुदानही मिळू शकेल. या नव्या धोरणाचा मसुदा तयार आहे. सरकार यावर लवकरच निर्णय घेईल असे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.
अन्न प्रक्रिया विभागाचे संचालक डॉ. आर. के. तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रक्रिया उद्योगाला उत्तर प्रदेशमध्ये संधी खूप आहे. देशात सर्वाधिक ऊस उत्पादक राज्य असल्याने आणि भाजीपाल्याचे दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादक राज्य असल्याने अन्नप्रक्रिया उद्योगाला येथे गती मिळेल. उत्तर प्रदेशमध्ये वाटाणे, बटाटे, टरबूज, भोपळा आदी पिकांचे मोठे उत्पादन होते. रताळा उत्पादनात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात दुधाचे उत्पादन सर्वाधिक होते. देशात उत्पादित होणाऱ्या दुधापैकी १७.६ टक्के म्हणजे २३.३ मिलिटन टन दुध उत्तर प्रदेशात उत्पादन होते अशी माहिती तोमर यांनी दिली.