साखर उद्योगाशी संबंधीत शेअर्समध्ये आज जोरदार तेजी पहायला मिळाली. केंद्र सरकारने एक्सपोर्ट कोटा खुला केल्याने या शेअर्सची गोडी वाढल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारने ३,६७५ टन अतिरिक्त कच्ची साखर निर्यात करण्यास मंजूरी दिली आहे. हा निर्यातीचा कोटा दहा हजार टनांपेक्षा अधिक असेल. युनायटेड किंगडममध्ये टेरिफ रेट कोट्याअंतर्गत याच्या निर्यातीला मंजुरी मिळाली आहे. टेरिफ कोट्याअंतर्गत युकेमध्ये जादा दराची अंमलबजावणी होईल. कंपन्या ही साखर शून्य अथवा कमी कस्टर ड्यूटी स्कीमखाली निर्यात करू शकतात. भारत हा जगातील तिसरा मोठा साखर निर्यातदार देश आहे. भारतातून सुमारे १७६.२ कोटी डॉलर्सची साखर निर्यात केली जाते.
ब्रिटनसाठी एक्सपोर्ट कोटा जारी झाल्याने शुगर सेक्टरशी संबंधी शेअर्स वधारले आहेत. द्वारकेश, त्रिवेणी इंजिनी., बलरामपूर चिनी या शेअर्समध्ये ५ ते १० टक्क्यांची तेजी दिसून आली.
फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत देशात २०८.८९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी याच कालावधीत उत्पादन १७०.०८ लाख टन होते. त्यामुळे यंदा भारतात साखरेचे वीस टक्के अतिरिक्त उत्पादन आहे. भारताने यंदा जादा साखर निर्यात केली तरी त्याचा देशांतर्गत बाजारावर परिणाम होणार नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. भारतात सध्या मागणीच्या दुप्पट साखरेचा साठा शिल्लक आहे.