नवी दिल्ली: इंडियन शुगर मील असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, चालू हंगामात, म्हणजेच ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत भारताकडून इंडोनेशिया आणि अफगाणिस्तानला सर्वाधिक साखर निर्यात झाली आहे. असोसिएशनने बाजारातील रिपोर्ट आणि बंदरांवरील माहितीनुसार सांगितले की, गेल्या वर्षी याच काळात ३०.६४ लाख टन साखर निर्यात झाली होती. तर आतापर्यंत २९.७२ लाख टन साखर निर्यात केली आहे. चालू हंगामातील निर्यातीमध्ये २०१९-२० या कालावधीतील एमएईक्यू अंतर्गत निर्यात केलेल्या ४.४८ लाख टन कोट्याचा समावेश आहे. त्याची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती. २०२०-२१ या हंगामासाठी निर्यात कोटा ६० लाख टन आहे.
गेल्या हंगामात भारतातील प्रमुख निर्यात ईराण आणि अफगाणिस्तानात करण्यात आली होती. यावर्षी इराणला साखर निर्यात अडचणीत आली. थायलंडच्या साखर निर्यातीसाठी पारंपरिक इंडोनेशिया बाजार होता. मात्र, थायलंडमध्ये कमी उत्पादनामुळे इंडोनेशियाने भारतातून निर्यात वाढवली आहे. इस्माने सांगितले की, देशातील साखर कारखान्याने या हंगामात १५ एप्रिलपर्यंत २९०.९१ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत २४८.२५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.