लखनौ : सन २०२०-२१ मध्ये महाराष्ट्राने साखर उत्पादनात उत्तर प्रदेशला पिछाडीवर टाकले आहे. कर्नाटक आणि गुजरातमध्येही यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात वाढ झाली आहे. कोरोना महामारीमुळे उद्योग बंद असताना ऊस उत्पादकांच्या ये-जा करण्यावर निर्बंध लागल्याने उत्तर प्रदेशमध्ये साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ लाख टनांनी घटले आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी याच कालावधीत झालेल्या १०८.२५ लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत यावर्षी १५ एप्रिल अखेर १००.८६ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय स्तरावर १५ एप्रिल २०२०पर्यंतच्या २४८.२५ लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत यंदा उत्पादन २९१ लाख टनावर पोहोचले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये ९८ साखर कारखाने सुरू होते. तर आता फक्त ६६ कारखाने सुरू आहेत. उद्योगातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, साखर उत्पादनातील घसरण उतारा खालावल्याने आणि ऊस लागवड घटल्याने झाली आहे.
याऊलट महाराष्ट्रात गेल्या काही काही वर्षापासून उत्तर प्रदेशपेक्षा पिछाडीवर असताना यंदा ४३.१९ लाख टन साखर उत्पादन वाढल आहे. गेल्यावर्षीच्या ६०.७६ लाख टन साखर उत्पानावरून यंदा १०४ लाख टनावर ते गेले आहे. कर्नाटकातही साखर उत्पादन २०२०मधील ३३.८२ लाख टनाच्या तुलनेत वाढून ४१.४५ लाख टनापर्यंत पोहोचले आहे. तामिळनाडू आणि गुजरातमध्येही या हंगामात साखर उत्पादन वाढले आहे.