चंडीगढ : हरियाणातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता डायल ११२ च्या प्रत्येकी २० गाड्यांचा वापर अॅम्ब्युलन्स म्हणून करण्यात येणार आहे. तर ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा कमी करण्यासाठी उद्योगांना आपल्याकडील सिलिंडर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. उद्योगांना सिलिंडर दिले नाहीत तर त्याचे अधिग्रहण केले जाईल असा इशारा देण्यात आला. ऑक्सिजन टँकरच्या वितरण प्रक्रियेवर पोलिसांचा वॉच राहणार आहे.
आरोग्य मंत्री अनिल विज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय कोविड दक्षता समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. विज यांनी सांगितले की, मेडिकल कॉलेजमध्ये अंतिम वर्षात शिकणाऱ्या एमबीबीएस आणि पीजी विद्यार्थ्यांनाही ड्यूटी लावली जाईल. जर कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली तर त्यांना खासगी रुग्णालयात कॅशलेस उपचार मिळतील.
राज्याची गरज भागविण्यासाठी सर्व मोठ्या उद्योगांकडील औद्योगिक ऑक्सिजनचे रुपांतर वैद्यकीय ऑक्सिजनमध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व खासगी, सरकारी हॉस्पिटल्सना स्वतःचा ऑक्सिजन प्लान्ट सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात अतिरिक्त बेडची व्यवस्था करावी. यासाठी बँक्वेट हॉल, शाळा, सामाजिक संस्थांचा वापर करावा. स्थानिक टीव्ही चॅनल, केबल नेटवर्कवर सर्व वरिष्ठ डॉक्टरांचे कोरोनाविषयीचे मार्गदर्शन सुरू केले जाईल. यामध्ये कोरोनाच्या रुग्णांनी कोविड प्रोटोकॉल, सावधगिरी कशी बाळगावी याची माहिती दिली जाईल.
संक्रमित पोलिसांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कोविड केंद्र
हरिणाया पोलिस दलातर्फे पोलिस लाईनमध्ये फ्रंटलाइन योद्धा म्हणून कार्यरत पोलिसांना उपचारांची सोय केली गेली आहे. पुढील तीन दिवसात प्रत्येक जिल्ह्यात १० ते २५ ऑक्सिजन बेड तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. जोपर्यंत संक्रमित कर्मचाऱ्याला कोविड रुग्णालयात प्रवेश मिळत नाही, तोपर्यंत त्यांना येथे उपचार दिले जातील. हरियाणाचे पोलिस महानिदेशक मनोज यादव यांच्या अध्यक्षतेखालील पोलिस मुख्यालयात एका बैठकीत हा निर्णय झाला. जीडीपी यादव म्हणाले की, पोलिस आयुक्त आणि जिल्हा एसपी तीन दिवसांत ऑक्सिजन सपोर्टसह १० ते २५ बेडची सुविधा निर्माण करतील. या केंद्रांवर टेली मेडिसिन सुविधाही असेल. राज्यातील ४६,९५९ पोलिसांनी पहिला तर २७२९६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. उर्वरीत पोलिसांना तातडीने दुसरा डोस देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी डीसीपी मोहम्मद अकील, एडीजीपी आलोक कुमार रॉय, ए. एस. चावला, नवदीप सिंह विर्क उपस्थित होते. यावेळी दिवंगत डीएसपी अशोक दहिया यांना आदरांजली वाहण्यात आली.