मुंबई : महाराष्ट्राने यंदाच्या हंगामात उच्चांकी साखर उत्पादनाकडे झेप घेतली आहे. चालू हंगामात ९५ खासगी आणि ९५ सहकारी अशा १९० साखर कारखान्यांनी १००५.४७ लाख टन उसाचे गाळप केले. यापूर्वी २०१७-१८ मध्ये राज्यात सुमारे ९५४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. राज्यातील कारखान्यांनी १०५४.३० लाख क्विंटल (१०५.४३ लाख टन) साखरेचे उत्पादन केले आहे. अद्याप राज्यात २८ कारखान्यांचे गाळप सुरू आहे.
कोल्हापूर आणि पुणे हे विभाग राज्यात साखर उत्पादनात अग्रेसर आहेत. राज्यात साखर पट्टा मानल्या जाणाऱ्या या दोन्ही विभागांत महाराष्ट्रात एकूण उत्पादनापैकी ५० टक्के साखर उत्पादन झाले. त्यासाठी ४६ टक्के उसाचे गाळप करण्यात आले. औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूरच्या दुष्काळी भागाने १९७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हे राज्याच्या एकूण उत्पादनाच्या तुलनेत १९ टक्के आहे. या दुष्काळग्रस्त भागात ५३ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. सध्या अहमदनगर विभागात १० तर औरंगाबाद विभागात ११ कारखाने सुरू आहेत.
राज्यातील साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर साखरेचा साठा उपलब्ध असून बाजारपेठेबाबत अनिश्चितता आहे. केंद्रीय ग्राहक, अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, जादा साखरसाठा कमी करण्यासाठी सरकारने कारखान्यांना निर्यातीचा ६० लाख टनाचा कोटा कारखानानिहाय निश्चित केला आहे. याशिवाय, अतिरिक्त साखर उत्पादन रोखण्यासाठी सरकार उसाचा रस, साखर, बी हेवी मॉलॅसिसपासून इथेनॉल याच्या उत्पादनास प्रोत्साहन देत आहे.