नवी दिल्ली : देशभरातील साखर कारखान्यांनी तेल वितरण कंपन्यांसोबत ३०२.३ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे करार केले आहेत. गेल्या हंगामात पुरविण्यात आलेल्या १७८ कोटी लिटरच्या तुलनेत ७० टक्के अधिक करार करण्यात आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त साखर साठ्याची समस्या कमी होणार असून चांगला परतावा मिळण्यासही मदत होईल. चालू गळीत हंगामात उसाचा रस आणि बी मोलॅसिसच्या माध्यमातून इथेनॉल उत्पादनामुळे साखर उत्पादन २० लाख टनापर्यंत कमी करण्यास मदत मिळेल.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) म्हणण्यानुसार, देशात इथेनॉल मिश्रण मोहिमेसाठी ११७.७२ कोटी लिटर इथेनॉल यापूर्वी देण्यात आले आहे. मात्र, याचे उत्पादन ७७ टक्के उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिसपासून करण्यात आले आहे.
प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार इस्माचे महासंचालक अविनाश वर्मा यांनी सांगितले की, गेल्यावर्षी इथेनॉल उत्पादनामुळे ७ ते ८ टन लाख साखर जादा उत्पादन घटविण्यात आले. आणि आता चालू हंगामाच्या अखेरपर्यंत २० लाख टनापर्यंतचा अतिरिक्त साखरसाठा कमी होऊ शकतो. इथेनॉलमुळे अतिरिक्त साखर उत्पादन कमी करता येते. याशिवाय यापासून चांगला परतावा मिळतो. इथेनॉलची विक्री त्वरीत होत असते. तर साखर विक्रीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे साखर कारखाने दर वर्षी इथेनॉल उत्पादनात वाढ करीत आहेत.