नकोदर : उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राप्रमाणे पंजाबमध्येही थकीत ऊस बिलाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कारखान्यांनी तातडीने पैसे अदा करावेत अशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करीत आहेत.
प्रसार माध्यमांतील माहितीनुसार, नकोदर सहकारी साखर कारखान्याकडे २०१९-२० या हंगामातील ऊस बिले अद्याप थकीत आहेत. त्यामुळे नकोदर, शाहकोट आणि फिल्लौर येथील ऊस उत्पादक अडचणीत आहेत. कारखान्याच्या गैर व्यवस्थापनामुळे बिले थकीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नोव्हेंबर २०१९ पासून शेतकऱ्यांनी अनेकदा कारखान्याच्या फेऱ्या मारल्या आहेत. मात्र, त्यांना ऊस बिले देण्यात आलेली नाहीत.
कारखान्याचे संचालक, इतर अधिकारी यांच्याकडून या समस्येवर तोडगा काढला जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. एस. भाटिया म्हणाले, साखर निर्यातचे सुमारे ४ कोटी रुपये केंद्र सरकारकडून अद्याप येणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे थकीत राहिले आहेत. हे पैसे आल्यावर शेतकऱ्यांना त्वरीत ऊस बिले अदा केली जातील.