नवी दिल्ली: चालू हंगामात साखर निर्यातीमध्ये भारताची चांगली कामगिरी झाली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय खाद्य सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, यावर्षी भारताची साखर निर्यात चांगली झाली आहे. आतापर्यंत सुमारे ५० लाख टन निर्यातीचे करार करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२०- सप्टेंबर २०२१ या हंगामात ६० लाख टन साखर निर्यातीचे उद्दीष्ट ठेवले आहे. २०१९-२० या हंगामात ब्राझिलनर जगातील सर्वात मोठा साखर उतपादक देश असलेल्या भारताने ५९ लाख टन साखरेची निर्या केली होती. या हंगामात ५० लाख टन साखरेच्या निर्यातीचे करार झाले आहेत. यावर्षी आतापर्यंत इंडोनेशिया, अफगाणिस्तान आणि यूएईमध्ये साखर निर्यात झाली आहे.
साखर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने साखर निर्यात धोरणाची घोषणा केली होती. पांडे म्हणाले, आर्थिक तरलतेच्या कमतरतेने अडचणीत असलेल्या कारखान्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देता यावेत यासाठी साखर निर्यातीस मंजूरी दिली आहे. याशिवाय कारखान्यांनी इथेनॉल उत्पादनास प्रोत्साहन दिले आहे.
याबाबत सांगताना खाद्य विभागाचे संयुक्त सचिव सुबोध गुप्ता म्हणाले, आर्थिक तरलता ही साखर उद्योगासमोरील मोठी अडचण आहे. एका बाजूला साखर निर्यात आणि दुसरीकडे इथेनॉल उत्पादनाला पाठबळ या पद्धतीने यातून मार्ग काढला जात आहे.
साखर निर्यातीबाबत गुप्ता म्हणाले, निर्यातीच्या टप्प्यावर चांगली कामगिरी आहे. सुरुवातीला लॉजिस्टिक समस्या, कंटेनर कमतरता भासली. मात्र, आता सर्वकाही सुरळीत आहे. आम्ही जूनपर्यंत उच्चांकी साखर निर्यात करू शकतो. त्यातून मिळणाऱ्या पैशांतून शेतकऱ्यांची बिले दिली जातील.