देशात आतापर्यंत ३०३.६० लाख टन साखर उत्पादन : इस्मा

नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) अलिकडेच जारी केलेल्या अहवालानुसार १ ऑक्टोबर २०२० ते १५ मे २०२१ या कालावधीत देशात ३०३.६० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत झालेल्या २६५.३२ लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत हे उत्पादन ३८.२८ लाख टनाने अधिक आहे. मात्र १५ मे २०२० रोजी गाळप सुरू असलेल्या कारखान्यांची संख्या ६३ होती. सद्यस्थितीत ४४ साखर कारखाने गाळप करीत आहेत.

उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी १५ मे २०२१ अखेर १०८.७० लाख टन साखरेचे उत्पाद केले आहे. गेल्यावर्षी या कालावधीत झालेल्या १२२.२८ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत १३.५८ लाख टनाने ते कमी आहे. यावर्षी १२० पैकी ९९ कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत २१ कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी १५ मेअखेर ४६ कारखाने सुरू होते. राज्यातील बहुतांश साखर कारखाने या महिना अखेरीस बंद होतील. काही कारखाने जूनपर्यंत सुरू राहू शकतात. उत्तर प्रदेशात यंदा गाळप हंगाम लांबला आहे. गूळ, खांडसरी युनीट लॉकडाऊनमुळे बंद झाल्याने सर्व ऊस साखर कारखान्यांकडे आला आहे.

महाराष्ट्रात १५ मे २०२१ अखेर १०६.१६ लाख टन साखर उत्पादन झाले. तर २०१९-२० या हंगामात झालेल्या ६१.३५ लाख टनाच्या तुलनेत हे उत्पादन ४४.८१ लाख टनाने अधिक आहे. सद्यस्थितीत २०२०-२१ या हंगामात १८५ कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. सद्यस्थितीत पाच कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत फक्त एक कारखाना सुरू होता.
कर्नाटकातील सर्व ६६ साखर कारखाने एप्रिल २०२१ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होते. राज्यात ४१.६७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. काही कारखाने जुलै २०२१ मध्ये खास हंगामात सुरू होणार आहेत.
सद्यस्थितीत तामीळनाडूमध्ये या हंगामात २८ साखर कारखान्यांपैकी ११ कारखाने सुरू आहेत. १५ मेअखेर राज्यात ६.३३ लाक टन साखर उत्पादन झाले. तर गेल्यावर्षी याच कालावधीत ५.८० लाख टन साखर उत्पादन झाले होते. गुजरातमध्ये आजअखेर १०.१७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि ओरिसा या उर्वरीत राज्यांत १५ मे अखेर एकूण ३०.५७ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. सद्यस्थितीत हरियाणात ५ कारखाने सुरू असून लवकरच ते गाळप पूर्ण करतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here