नवी दिल्ली : चीनी मंडी
यंदाच्या गाळप हंगामात देशातील साखर उत्पादन २.१ टक्क्यांनी वाढून ७० लाख ५० हजार झाल्याची माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिली आहे. हंगाम सुरू झाल्यापासून १५ डिसेंबरपर्यंतची ही आकडेवारी आहे. गेल्या हंगामात याच काळात कारखान्यांनी ६९ लाख टन साखर उत्पादन केले होते. विशेष म्हणजे या टप्प्यात महाराष्ट्र साखर उत्पादनात आघाडीवर आहे.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक देश असलेल्या भारतात यंदाच्या २०१८-१९च्या हंगामात ३१५ लाख टन साखऱ उत्पादन होण्याचा अंदाज असोसिएशनने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी देशात ३२५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्या तुलनेत यंदा उत्पादनात थोडी घट होणार आहे. तर, याच वर्षी देशातील साखरेचा खप २६० लाख टनापर्यंत राहण्याची शक्यता आहे.
इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, देशात १५ डिसेंबरपर्यंत ४६२ साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे. त्यातून ७० लाख ५० हजार टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या ६९ लाख टन उत्पादनापेक्षा हे उत्पादन २.१ टक्क्यांनी जास्त आहे. महाराष्ट्रात गेल्या हंगामात याच काळात २५ लाख ७० हजार टन साखर उत्पादन झाले होते, तर यंदा त्यात वाढ झाली असून, २९ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यंदा साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात सध्या १७६ साखर कारखान्यांमध्ये गाळप होत असून, सरासरी १०.१८ रिकव्हरी मिळत आहे. गेल्या वर्षी १०.१० रिकव्हरी मिळाली होती.
दुसरीकडे साखर उत्पादनात कायम आघाडीवर असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये यंदा उत्पादनात घट झाली आहे. गेल्या हंगामातील २३ लाख ३० हजार टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा १८ लाख ९० हजार टन साखर उत्पादन झाले आहे. दुसरीकडे कर्नाटकमध्ये गेल्यावर्षीच्या ११ लाख २० हजारच्या तुलनेत यंदा १३ लाख ९० हजार टन साखर उत्पादन झाले आहे.
महाराष्ट्रात सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस झाल्याने तसेच पांढऱ्या हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात काही महत्त्वाच्या साखर पट्ट्यातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन घटण्याचा अंदाज शुगर मिल्स असोसिएशनने व्यक्त केला आहे
दरम्यान, १५ डिसेंबरपर्यंत गुजरातमध्ये ३ लाख १० हजार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये १ लाख ५ हजार, तमीळनाडूमध्ये ८५ हजार टन साखर उत्पादन झाले आहे. बिहारमध्ये १ लाख ३६ हजार, पंजाबमध्ये ३५ हजार, हरियाणात ९० हजार तर मध्य प्रदेशमध्ये ६५ हजार टन साखर उत्पादन झाले आहे.