कोल्हापूर : चीनी मंडी
केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव दोन हजार ९०० रूपये केला आहे. मात्र, काही साखर कारखाने यापेक्षा कमी दराने साखर विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावर जो कारखाना कमी दराने साखर विक्री करेल. त्याची चौकशी करून कारखान्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय अन्न व पुरवठा नागरी राज्यमंत्री रामविलास पासवान यांनी दिले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मंत्री पासवान यांची भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील काही साखर कारखाने केंद्राने ठरवून दिलेल्या भावापेक्षा कमी दराने साखर विकत असल्याची तक्रार खासदार शेट्टी यांनी केली. त्याची दखल घेत वेळी पासवान यांनी मंत्रालयाचे सचिव रविकांत यांना कारवाईचे आदेश दिले.
साखर उद्योग सध्या अडचणीत आहे. केंद्र सरकारने किमान दर २ हजार ९०० रुपये दिला असला, तरी तो साखर कारखान्यांना परवडणारा नाही. पण, तरीही साखर कमी दर्जाची असल्याचे दाखवून त्यापेक्षा कमी दराने कारखाने विक्री करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे साखरेच्या होलसेल दरात आणखी घट होत आहे. ऊस उत्पादकांना देण्यात येणारा एफआरपीचा दर जास्त आहे. त्यामुळे त्या साखर कारखान्यांना कमी दरात साखर विकणे परवडत नाही. परिणामी शेतकऱ्यांची एफआरपीची मोठ्या प्रमाणात थकबाकी राहण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकर्यांना बसत आहे. केंद्राने तातडीने कमी दरात साखर विकणार्या साखर कारखान्यांच्या चौकशी करून कडक कारवाई करावी, तसेच दोन हजार ९०० रूपये हा भाव गेल्या वर्षीची एफआरपी डोळ्यासमोर धरून केला आहे. यंदा वाढलेला उत्पादन खर्च लक्षात घेता यावर्षी साखरेच्या विक्रीचा दर किमान तीन हजार ४०० प्रति क्विंटल करावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी केली.
साखरेचे भाव वाढविण्याचे सरकार विचार करत असून, लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री पासवान यांनी स्पष्ट केले. तसेच जे साखर कारखाने कमी दरामध्ये साखर विकतील, त्यांची चौकशी करून तातडीने कारवाई करण्यात यावी, आदेशही दिले.
खासदार राजू शेट्टी यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव रविकांत यांची भेट घेऊन त्यांनाही वस्तुस्थिती सांगितली. सचिव रविकांत यांनीही त्याची गंभीर दखल घेत, कमी दरामध्ये साखर विकल्याचे आढळून येणाऱ्या कारखान्यांचा विक्रीचा कोटा त्वरीत रद्द करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी दिले.
कमी दरामध्ये साखर विकलेल्या कारखान्यांची माहिती पुराव्यानिशी देत असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार शेट्टी यांनी यावेळी केली.