पेशावर : पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये नॅशनल अकाउंटॅब्लीटी ब्युरोने (एनएबी) एका मोठ्या साखर घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे. या घोटाळ्यात साखर कारखान्याच्या मालकांनी अफगाणीस्तानसाठी मंजूर झालेल्या आपल्या कोट्यातील साखर कमी निर्यात करून ती पाकिस्तानमध्येच विकली. त्यामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, साखर निर्यातदारांनी खोटी कागदपत्रे तयार करून त्या आधारावर सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या संगनमताने मंजूर साखर कोटा विकल्याचे दाखवून त्यावर आयकरातून सूट मिळविण्यासाठी अर्ज केला. निर्यातदार आणि साखर कारखान्याच्या मालकांनी पाकिस्तानमध्येच अवैध पद्धतीने साखर विक्री केली आणि करांमध्ये सवलत मिळवून प्रचंड नफा कमावला.
एनएबी या तपास संस्थेने याची चौकशी सुरू केली आहे. पेशावर येथील मूल्यांकन विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे २७ मे पर्यंत अहवाल मागविण्यात आला आहे. एनएबीने अफगाणीस्तानला साखर निर्यात करणाऱ्या साखर कारखानदारांचे मालक आणि त्यांचा कोटा याचीही माहिती मागवली आहे. साखर कारखान्यांचे निर्यात परमीट, घोषणा पत्र, ई फॉर्म, बिल, सीमा शुल्क चलन आणि पॅकींग यादी मागविली आहे. खैबर पख्तूनख्वामधील एनएबीच्या महासंचालकांनी या आरोपांबाबत पारदर्शी तपासाचे आदेश दिले आहेत.