नवी दिल्ली : चालू हंगामात साखर कारखान्यांकडून निर्यातीचा उच्चांक स्थापन केला जाण्याची शक्यता आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, देशातील साखर कारखान्यांनी अनुदानाशिवाय साखर विक्री सुरू केली आहे. त्यामुळे गेल्यावर्षी झालेल्या निर्यातीत १४ टक्क्यांची वाढ होऊन, २०२०-२१ मध्ये उच्चांकी ६.५ मिलियन टन निर्यात केली जाऊ शकते. साखर उद्योगातील जाणकारांनी या निष्कर्षाला दुजोरा दिला आहे.
स्थानिक किंमती स्थिर ठेवण्यास आणि साखर साठा कमी करण्यासाठी हे प्रयत्न उपयुक्त ठरतील. नॅशनल फेडरेशन ऑफ
को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, भारतात सध्याच्या हंगामात ६.५ मिलियन टन साखर निर्यात सहजपणे केली जाऊ शकते. जर जागतिक किंमत १८ सेंटपेक्षा अधिक असेल तर निर्यात आणखी वाढू शकेल.
भारताने चालू हंगाम २०२०-२१मध्ये साखर कारखान्यांना ६० लाख टन साखर निर्यातीला अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. सद्यस्थितीत केंद्र सरकारकडून साखर निर्यात अनुदान ६,००० रुपयांवरून कमी करून ४,००० रुपये करण्यात आले आहे.