लखनौ : उत्तर प्रदेशातील साखर हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. मात्र, अद्याप काही साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे.
याबाबत प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, चालू हंगामात १२० कारखाने सुरू होते. त्यापैकी ११० कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले आहे. तर उर्वरीत १० कारखाने या महिनाअखेर अथवा जूनच्या सुरुवातीला बंद होतील. राज्यातील १२० कारखान्यांनी आतापर्यंत ११० लाख टन साखर उत्पादन केले आहे. हे उत्पादन गेल्यावर्षी झालेल्या १२६ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी कमी आहे. आतापर्यंत कारखान्यंनी १०१८.८२ लाख टन उसाचे गाळप करून १०९.८१ लाख टन साखर उत्पादन केले आहे.
उद्योगातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचा यंदाचा हंगाम ११०.५० लाख टनापेक्षा थोडा अधिक साखर उत्पादन करून पूर्ण होऊ शकतो. २४ मे अखेर चालू हंगामातील १२० कारखान्यांनी शेतकऱ्यांना २०,३२४ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. तर अद्याप ११,९१३ कोटी रुपये थकीत आहेत.