मुझफ्फरनगर : कोरोना विरोधातील राज्य सरकारच्या लढाईला साखर उद्योगानेही साथ दिली आहे. ग्रामीण भागात लसीकरण अभियानाला गती देताना जिल्ह्यातील काही कारखान्यांनी आठ लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. स्थानिक प्रशासनाने कारखान्याकडून नोंदणीकृत शेतकऱ्यांची माहिती घेऊन एसएमएसच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या सेवेचा उपयोग गाळप हंगामावेळी एसएमएसद्वारे सूचना देण्यासाठी कारखान्यांकडून केला जातो.
अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी अमीत सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची माहिती असते. त्यातून त्यांच्यापर्यंत लसीकरण मोहीम नेण्यासाठी मदत मिळत आहे. आम्ही एसएमएस पाठवत असून शेतकऱ्यांना कारखान्यांकडून ठराविक दिवस, वेळ निश्चित केला जातो. याशिवाय प्रशासनाने गावागावांत लसीकरण मोहीम सुरू केली आहे. या विभागाचे उप विभागीय अधिकारी दीपक कुमार म्हणाले, केवळ लसीकरण नव्हे तर कोविड पॉझिटिव्ह लोकांची माहिती मिळविण्यासाठीही या सेवेचा वापर केला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनाची सोय केली गेली आहे.