लखनौ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळवून देण्यासाठी ऊस आणि धान्यापासून इथेनॉल उत्पादनाचे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. या मोहिमेंतर्गत ऊसापासून इथेनॉल उत्पादनाचे ५४ प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. उसाशिवाय तांदूळ, गहू, मक्का, ज्वारी यांपासून इथेनॉल उत्पादन करणारे सात प्रकल्प आहेत. उसापासून इथेनॉल उत्पादनाच्या ५४ पैकी २७ प्रकल्प पूर्ण झाले असून उर्वरीत २७ प्रकल्पांच्या निर्मितीचे काम सुरू आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत ते पूर्ण केले जाईल. तांदूळ, गहू, मक्का, ज्वारी आदी धान्यापासून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प पुढील काही महिन्यांत सुरू होऊ शकतात.
याबाबत यूएनआय या वृत्तसंस्थेला राज्यातील कृषी संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, इथेनॉलच्या ६१ योजनांचा लाभ सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना होईल. त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या योजनांचा आढावा घेत उत्पादनास गती देण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले, या प्रकल्पांना एनओसी देण्यास उशीर केला जाऊ नये. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऊस हे नकदी पिक आहे. बुंदेलखंड वगळता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात उसाचे उत्पादन होते. काही महिन्यांपूर्वी साखर कारखाने, खांडसरी, गुळाचे व्यापारी हे उसाचे खरेदीदार होते. मात्र, आता इथेनॉलही उत्पादन केले जात आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या निर्देशानंतर इथेनॉल उत्पादन योजनांत गुंतवणुकीला अनेकांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना आता खरेदीदार शोधण्यासाठी कारखाने अथवा खांडसरींकडे जावे लागणार नाही.