रेल्वेकडून मे महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक मालवाहतूक

नवी दिल्ली : कोरोनामुळे निर्माण झालेली आव्हाने असतानाही, राष्ट्रीय वाहतूकदार असलेल्या भारतीय रेल्वेने यंदाच्या मे महिन्यात आजवरची सर्वाधिक मालाचे लोडिंग करण्यात आले असल्याची माहिती मंगळवारी दिली. रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मे २०२१ मध्ये रेल्वेने ११४.८ मिलियनटन लोडिंग केले. मे २०१९च्या (१०४.६ मिलियन टन) तुलनेत ते ९.७ टक्क्यांनी अधिक आहे.

त्यांनी सांगितले की, मे २०२१ मध्ये वाहतूक झालेल्या महत्त्वाच्या वस्तूंमध्ये ५४.५२ मिलीयन टन कोळसा, १५.१२ मिलियन टन लोह खनिज, ५.६१ मिलियन टन अन्नधान्य, ३.६८ मिलियन टन खते, ३.१८ मिलियन टन खनिज तेल, ५.३६ मिलियन टन सिमेंट आणि ४.२ मिलियन टन क्लिंकरचा समावेश आहे. रेल्वेने या वाहतुकीच्या माध्यमातून मे २०२१ मध्ये ११,६०४.९४ कोटी रुपये कमावले आहेत.

मे महिन्यात वॅगन टर्न अराउंड टाइममध्ये २६ टक्क्यांची सुधारणा झाल्याचेही रेल्वेच्या प्रवक्त्यांनी सांगितले. वॅगन टर्न अराउंट टाइम मे २०१९ मध्ये ६.४६ होता. त्या तुलनेत आता ४.८१ दिवस आहे. सध्याच्या नेटवर्कमध्ये मालवाहतुकीची गती वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यातून खर्चात बचत होणार आहे. गेल्या १८ महिन्यांत माल वाहतुकीची गती दुप्पट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सुमारे चार क्षेत्रांमध्ये मालगाड्यांची सरासरी गती ५० कि.मी. प्रती तास नोंदविण्यात आल्याचेही प्रवक्त्यांनी सांगितले.

भौगोलिक परिस्थितीमुळे काही विभागांत मालगाड्यांची कामगिरी गती चांगली आहे. मे २०२१ मध्ये मालगाड्यांसाठी ४५.६ किमी प्रती तास गती नोंदवली गेली. याआधीच्या ३६.१९ किमी प्रती तास या गतीच्या तुलनेत यात २६ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here