नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या फैलावाने लोकांना दुहेरी फटका बसला आहे. या महामारीमुळे गेल्या महिन्यात, मे मध्ये १.५४ कोटी भारतीयांना नोकरी गमवावी लागली आहे. गेल्या वर्षभरापासून देसात आर्थिक सुधारणा ठप्प झाली आहे. सद्यस्थितीत बेरोजगारीत सुधारणांची शक्यता नाही. जुलै २०२० मध्ये ग्राहकांची क्रयशक्ती घटली असून अर्थव्यवस्थेत सुधारणेची शक्यता नसल्याचे सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) संस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
सीएमआयईच्या अहवालानुसार एप्रिल महिन्यात ३९.७ कोटी लोकांजवळ रोजगार होते. मात्र, मे महिन्यात ही संख्या घटून ३७.५ कोटींवर पोहोचली. एप्रिल आणि मे महिन्यात जेव्हा कोरोनाचा सर्वोच्च फैलाव झाला, तेव्हा नोकऱ्या झपाट्याने घटल्या. एप्रिल आणि मे महिन्यात नोकरदार आणि बिनपगारी नोकरीत २.३ कोटींची घट झाली आहे. जवळपास ५.०७ कोटी लोग बेरोजगार असून संधी नसल्याने त्यांच्याकडे रोजगार उपलब्ध नाहीत.
मे महिन्यात १२ टक्के बेरोजगारीचा दर झाला असून आधीच्या महिन्यात एप्रिलमध्ये तो ८ टक्क्यांवर होता. संघटीत क्षेत्रात नोकरीच्या संधी निर्माण होण्यास उशीर लागतो. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीचा दर २३.५ टक्क्यांवर गेला होता. आता अनेक राज्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणून अर्थव्यवहारांना गती दिली आहे. दरम्यान, एप्रिल म्हन्यात सीएमआयने १.७५ लाख कुटुंबांचा देशव्यापी सर्व्हे केला. त्यात ९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न महामारीच्या काळात कमी झाल्याचे आढळून आले आहे. फक्त ३ टक्के लोकांनी त्यांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले. तर ५५ टक्के लोकांनी उत्पन्न घटल्याचे सांगितले आहे.