सुवा : देशाच्या उत्तर विभागात यंदाच्या हंगामात ऊस उत्पादनात सुमारे ३५ टक्के घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राष्ट्रीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र लाल यांनी सांगितले की, अलीकडे आलेली दोन चक्रीवादळे आणि डिसेंबरपासून सातत्याने निर्माण झालेली पावसाळी स्थिती याचा परिणाम म्हणून ऊस उत्पादनात घट येणार आहे.
उत्तर विभागाला चक्रीवादळ टीसी यास आणि टीसी एनाचा फटका बसला होता. याशिवाय, गेल्या महिन्यांत सातत्याने पावसाळी वातावरण होते. त्याचा थेट परिणाम उसाच्या उत्पादनावर पहायला मिळत आहे.
लाल यांनी सांगितले की, गेल्या काही दशकांपासून आम्ही आमच्या अनुभवाच्या आधारावर उत्पादनाचे विश्लेषण करीत आहोत. जेव्हा आम्ही सातत्याने खराब हवामानाचा सामना करतो, तेव्हा शेती आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे नुकसान होते. त्यानंतर उसामध्ये अशा पद्धतीची मोठी घट पहायला मिळते असे ते म्हणाले. लाल म्हणाले, खराब हवामानासोबतच अंदाजे ऊस दराची घोषणा करण्यास उशीर झाला आहे. आमचे सदस्य नेहमी हा मुद्दा उपस्थित करतात. कारण, आम्हाला मजुरांचे पैसे आणि इतर खर्चाची तजविज करावी लागते. यावर्षी आम्हाला प्रती टन किती पैसे मिळणार आहेत, याची आम्हाला माहिती नसते. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होतात.
दरम्यान, साखर मंत्रालयाचे स्थायी सचिव योगेश करण यांनी सांगितले की, उसाच्या दराची घोषणा लवकरच केली जाईल.