अमरोहा : येथील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसाची सुमारे ४ कोटी रुपयांची बिले थकवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. प्रशासनाने साखर कारखान्यांच्या विरोधात कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. कारखान्यांनी एका आठवड्यात पैसे दिले नाहीत, तर त्यांच्याविरोधात नोटीस बजावून कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यात सव्वा लाखाहून अधिक शेतकरी ऊस शेतीवर अवलंबून आहेत. जिल्ह्यात तीन साखर कारखाने गाळप करतात. तिन्ही कारखान्यांनी आतापर्यंत खरेदी केलेल्या ऊसाची शंभर टक्के बिले अदा केलेली नाहीत. जवळपास २० टक्क्यांहून अधिक पैसे थकीत आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पाठविल्यानंतर चौदा दिवसांत पैसे देण्याचा नियम आहे. याऊलट साखर कारखान्यांनी गाळप हंगाम संपल्यावरही पैसे दिलेले नाहीत. उसाची बिले न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोषआहे. भारतीय किसान युनीयनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेंद्र सिंह यांनी जिल्हा प्रशासनाने याबाबत कडक कारवाई केली नसल्याचा आरोप केला आहे. लवकर पैसे न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे एका आठवड्यात कारखान्यांनी पैसे न दिल्यास प्रशासनाकडून संबंधित कारखान्यांना नोटिसा दिल्या जातील असे जिल्हा ऊस अधिकारी हेमेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले आहे.