ढाका : कुश्तिया साखर कारखान्याच्या गोदामातून ५३ टन साखरेची चोरी झाली आहे. उद्योग मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीच्या तपासणीच ही बाब उघड झाली. उद्योग मंत्रालयाचे अप्पर सचिव शिवनाथ रॉय यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांच्या समितीने चौकशी केली. समितीच्या इतर सदस्यांमध्ये मंत्रालयाचे संयुक्त सचिव अनवारुल आलम, बांगलादेश साखर आणि खाद्य उद्योग विभागाचे योजना प्रमुख ऐनुल हक, उप महाव्यवस्थापक इलियास सिकदर आणि कार्यकारी महा व्यवस्थापक हमीदुल इस्लाम यांचा समावेश आहे.
कुश्तिया साखर कारखान्याकडे १२१ टन साखर असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात तेथून ५३ टन साखर गायब आहे. या साखरेची बाजारातील किंमत सुमारे ३३ लाख रुपये आहे. तीन जून रोजी हा प्रकार पहिल्यांदा उघडकीस आला. तेव्हा साखर साठ्याबाबत अहवाल सादर करण्यात आला होता. स्टोअर किपर फरीदुल इस्लाम यांनी तयार केलेल्या अहवालात साठा, विक्री आणि उत्पन्नाबाबत विसंगत माहिती दिसून आली होती.
शंका आल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोदामाची पाहणी केली. त्यामध्ये ५३ टन साखर गायब असल्याचे उघड झाले. फरीदुल याला ५ जून रोजी निलंबीत करण्यात आले आहे.
या प्रकरणाच्या तपासणीसाठी कारखान्याचे वित्त विभागाचे महा व्यवस्थापक कल्याण कुमार देबनाथ यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. गोदामातून साखर गायब असल्याची फिर्याद कुश्तिया मॉडल पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली. उद्योग मंत्रालयाने ६ जून रोजी स्वतंत्र तपास समिती स्थापन केली. समितीच्या सदस्यांनी कालपासून चौकशी सुरू केली आहे. कारखान्याकडून झालेली साखर निर्मिती, इतर उत्पादनांचा स्टॉक, विक्री, उत्पन्नाबाबतची कागदपत्रे तपासली जात आहेत. त्यांनी गोदामाच्या आजी-माजी अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे. संशयित व्यक्तींची ओळख पटवून चौकशी केली जात आहे. दहा जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.