दरभंगा: दरभंगा येथील अशोक पेपर मिल परिसरात सुमारे ५२४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने ५०० किलोलीटर प्रती दिन क्षमतेचे इथेनॉल युनिट सुरू होणार असल्याची माहिती खासदार गोपाल ठाकूर यांनी दिली. मक्का प्रोसेसिंगच्या माध्यमातून दरभंगामध्ये इथेनॉल उत्पादन होणार आहे.
बिहार सरकारचे उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन यांची भेट घेतल्यानंतर खासदार ठाकूर यांनी ही माहिती दिली. मिथिलेच्या परंपरेनुसार मंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकूर यांनी दरभंगाच्या औद्योगिक विकासाबाबत चर्चा करून निवेदन दिले. दरभंगा इंडस्ट्रियल एरिया बाबत चर्चा झाली. यावेळी मंत्री आणि विभागीय सचिवांसोबत बैठक घेण्यात आली.
दरभंगा येथील सारामोहनपूर येथे मिथिला हाटसोबत खादी मॉल आणि खादी पार्क सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य सरकारला १९६६ मध्ये ५ एकर १६ गुंठे जमीन लीजवर मिळाली होती. याठिकाणी तलाव सौंदर्यीरण आणि खादी मॉल सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. दरभंगामध्ये मिनी फूड पार्क होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कृषी आधारीत फूड पार्कमुळे रोजगार निर्मिती होणार आहे.
मौलागंजमध्ये ४० लाख रुपये खर्चाचे कॉमन फॅसिलिटी सेंटर सुरू करण्यात आले आहे. तेथे स्थानिक कौशल्यासाठी कार्यक्रम राबवले जाणार आहेत. या सेंटरच्या उद्घाटनाबाबत खासदार ठाकूर यांनी मंत्री हुसैन यांना आमंत्रण दिले. दरभंगामध्ये गारमेंट उद्योग स्थापन करण्यासह सामान्य सुविधा केंद्र निर्माण करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव ब्रजेश मल्होत्रा, खादी बोर्डाचे सीईओ अशोक कुमार सिन्हा आदींसह अधिकारी उपस्थित होते.