मुजफ्फरनगर : कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी भारतीय किसान युनियनने (भाकियू) छपार टोल नाक्यावर १६ व्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले. यावेळी खाईखेडी कारखान्याने जर व्याजासह ऊस बिले दिली नाहीत तर आंदोलनाचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. सिंभालकी गावातील लेखपालावर शेतकऱ्यांकडून अवैध वसुली केल्याचा आरोप करण्यात आला.
दिल्ली – डेहराडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५८ वरील छपार टोल प्लाझावर भाकियुने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनस्थळी जेवण तयार केले जाते. भाकियूचे पूरकाजी विभागाचे अध्यक्ष मांगेराम त्यागी यांनी सांगितले की, भाजप सरकारमध्ये पोलिस आणि प्रशासन अधिकाऱ्यांची मनमानी, भ्रष्टाचार सुरू आहे. कोणतेही काम लाच घेतल्याशिवाय होत नाही. शेतकऱ्यांनी देशभर गेले सात महिने कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू ठेवले आहे. ४०० हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही सरकारने दखल घेतलेली नाही. विज विभागाकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. भरमसाठ विज बिल पाठवले जात आहेत. प्रचंड उकाडा असताना विज खंडीत केली जाते. पाण्याचा तुटवडा आहे. ऊसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
खाईखेडीच्या उत्तम साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना हफ्त्यांमध्ये ऊस बिले दिली जात आहेत. जर कारखान्याने व्याजासह पैसे दिले नाहीत तर बेमुदत आंदोलन केले जाईल. सिंभालकी येथील शेतकरी शीशपाल गुर्जर, बोबिद्र आणि काळूराम यांनी लेखपालाच्या अवैध वसुलीचा मुद्दा मांडला. यावेळी ईशाक अहमद अध्यक्षस्थानी होते. तर मास्टर ओमपाल यांनी संचालन केले. यावेळी शहजाद त्यागी, अमित त्यागी, कयूम अंसारी, प्रशांत त्यागी, ललित त्यागी, राजा गुर्जर, मुकीम खुड्डा, मंगता हसन, राशिद त्यागी, इक्बाल प्रधान, उस्मान त्यागी आणि मुशर्रफ त्यागी आदी उपस्थित होते.