सोलापूर : चीनी मंडी
सोलापूर येथे नव्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या कार्यालयाला सोलापूरच्या शेजारचा उस्मानाबाद जिल्हा जोडण्यात आला आहे. सोलापूरचे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय हे राज्यातील आठवे सहसंचालक कार्यालय असेल.
सोलापूर जिल्ह्यातील ३९ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ अशा एकूण ५५ साखर कारखान्यांसाठी हे सहसंचालक कार्यालय काम पाहणार आहे. याबाबत राज्याचे सहकार आणि पनन मंत्री म्हणाले, ‘सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत ऊस क्षेत्र झपाट्याने वाढले. पाठोपाठ साखर कारखान्यांची संख्याही वाढली. त्यामुळे येथे साखर सहसंचालक कार्यालयाची गरज होती. आता सोलापुरात या कार्यालयाबरोबरच ऊस संशोधन केंद्रालाही मंजुरी मिळाली आहे. पण, त्यासाठी जागेची अडचण आहे. तो प्रश्न मार्गी लावणार आहे.’
महाराष्ट्रात सध्याच्या घडीला कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती आणि नागपूर अशी सात प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालये आहेत. सोलापूरचा विचार केला, तर त्या जिल्ह्याचे काम पुणे सहसंचालक कार्यालयातून चालते. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर आणि उस्मानाबादसाठी सोलापूर येथे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाची मागणी होती. त्याला आता हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. पुढील महिन्यात या कार्यालयाच्या कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सहसंचालक कार्यालयामुळे साखर कारखान्यांबरोबरच शेतकऱ्यांचीही सोय होणार आहे. यापूर्वी एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी मुद्दे मांडण्यासाठी सोलापुरातील कारखानदार किंवा शेतकऱ्यांना पुण्यापर्यंत २५० किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. तर, उस्मानाबादकरांना नांदेड गाठावे लागत होते. आता दोन्ही जिल्ह्यातील कारखानदारांबरोबरच शेतकरी आणि त्यांच्या संघटनांची सोय होणार आहे.